*आज जागतिक ग्रंथ दिन*

 🌹📚🌹🔆🌅🔆🌹📚🌹

*आज जागतिक ग्रंथ दिन*


     *आज २३ एप्रिल हा 'जागतिक ग्रंथ दिन'. विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन आणि स्मृतीदिनही.*

        *ग्रंथ विवेक शिकवतो. जगाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी देतो. मनुष्य जीवनातील गुंतागुंत समजायला शिकवतो. ग्रंथ म्हणजे मानवी प्रगतीचे सर्वात मोठा स्रोत.. कुबेर भंडार.*    

        *भारतीय संस्कृतीचे ग्रंथाशी सनातन नाते आहे. या ग्रंथातून भारतभूचा वैभवशाली इतिहास मांडला गेलाय. अडीच हजार वर्षापूर्वीचा लिखित वैभवशाली इतिहास उपलब्ध आहे. ग्रंथ हे जीवन समृद्ध करतात. तसेच आरसा दाखवत सावधही करतात. वैभव लुटण्यासाठी भारत देशावर सतत परकीय आक्रमणे कशी झाली याचा इ. स. पूर्व ३०० पासूनचा इतिहास उपलब्ध आहे. ग्रीक राजा सिकंदर ते इंग्रजा पर्यन्तचा इतिहास सांगणारे हे ग्रंथ देशाला सावध करतात.* 

        *ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. सुखी.. समाधानी आनंदी जीवनासाठी प्रवेशव्दारच. ग्रंथ मानवी जीवन क्रांती घडवितात. दिवसागणिक जीवन समृद्ध होतेय ते ग्रंथातील ज्ञानामुळेच. मग ते कोणतेही असो.. धर्म, साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान हे सारे ज्ञान ग्रंथात दडलेय.* 

        *नवनवीन तंत्रज्ञान ग्रंथातूनच पूढे आलेय. प्राचीन काळापासून ग्रंथलिखाणाच्या पद्धतीत बदल होत.. शिळाग्रंथ.. इष्टिकाग्रंथ.. बांबूच्या चिरफळ्यावरचा ग्रंथ.. पपायरसावर.. चर्मग्रंथ.. धातूचा पत्रा.. यानंतर कागद तर आता संगणकीय ई ग्रंथ अशी प्रगती झालीय. भारतात तक्षशिला.. नालंदा, विक्रमशिला.. वल्लभी.. पुण्यगिरी अशी विश्वविद्यालये होती जिथे विदेशातील मुलेही ग्रंथाव्दारे अध्ययन करायची.*

        *जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ हा भारतीय 'ऋग्वेद' हा आहे. हे चारही वेद तसेच पुराण ग्रंथही प्राचीन आहेत. "पुरा नवंं भवति इति पुराणम्।" जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते ते पुराण, अशी त्याची व्याख्या. १८ पुराणे व १८ उपपुराणे या ग्रंथामध्ये राजधर्म, न्यायव्यवस्था, धर्मशास्र, देवतांंच्या स्तुतिपर कथा, आयुर्वेद, रत्नशास्र, विविध तीर्थक्षेत्रांंचे वर्णन इत्यादी विषयांंचे वैपुल्य असा इतिहास आहे.*

        *भारतीय संस्कृतीला दिशा देत समृद्ध करण्याची परंपरा पूढे संत साहित्याने ही कायम राखलीय. भारत भूमीतील व्यासमुनी.. वाल्मिकी.. पतंजली.. कालीदास.. सुश्रुत.. असो वा आर्यभट्ट असे कित्येक विविधांगी विषयाचे लेखक तसेच आमची संत मंडळ ग्रंथामुळेच जगविख्यात ठरलीय.*

        *हीच परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेवानी वयाच्या १६ व्या वर्षी तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी, तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवली. लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधलेय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी "वाचाल, तर वाचाल" हा अनमोल मंत्र दिलाय.*

        *गावातील ग्रंथालय हे गावाचे सांस्कृतिक वैभव आहे. वाचक म्हणजे देशातील सुज्ञ नागरिक अशी त्याची ओळख आहे. ग्रंथ समाजात एकात्मता निर्माण करतात. वाचनामुळेच देशाला दिशा देणारे महापुरुष घडलेत. ग्रंथ.. पुस्तक म्हणजे जीवनास धडा देणारा इतिहास.. जीवन सुखद करणारे वर्तमान आणि जीवन उन्नत करणारा भविष्यकाळ. पुस्तकांमुळेच जग जवळ आलेय. संत रामदास स्वामींनी दिसामाजी काही तरी लिहण्यास सांगितलेय, त्याप्रमाणे लेखन समृद्धी वाढतेय.*

        *नविन ग्रंथ.. पुस्तक उत्सुकतेने बघणे. त्याचा गंध अनुभवणे.. चाळणे.. वाचणे हा अवर्णनीय आनंद आहे. पुस्तक नात्याचा अर्थ सांगत प्रेम करायला शिकवते. पुस्तक हे केवळ पुस्तकच नसते. पुस्तक आशा.. आकांक्षानी जीवन सदैव प्रवाही ठेवते. त्यात रमून स्वर्गीय सुखाची अनुभुती प्राप्त करता येते. ग्रंथ.. पुस्तक ही प्रत्येकाची मर्मबंध ठेव असते. ग्रंथ हेच गुरु.* 

        *वाचन संस्कृती टिकविण्यासाठी झटणारे लेखक.. प्रकाशक.. वितरक.. कधीही क्षय न होणारे अक्षर धन जपणाऱ्या ग्रंथपाल बंधूभगिनीं आणि सर्व वाचनप्रेमींना या ग्रंथदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!*


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*