*तुटक्या स्वप्नांची फुटकी वलयांकित वास्तू! मूलचे छ. शिवाजी महाराज व्यापारी संकूल*

 *बिग ब्रेकिंग*


*तुटक्या स्वप्नांची फुटकी वलयांकित वास्तू! मूलचे छ. शिवाजी महाराज व्यापारी संकूल*

*लोकार्पण होऊन अवघे दोन महिने होतात न होतात तोच.....*

*दीपक देशपांडे मूल*

करोड रुपये म्हणजे काय? हा प्रश्न एखाद्या गावखेड्यातील माणसाला विचारुन बघा!त्यांच्या संपूर्ण कुटूंबाची आयुष्यभराची कमाई सुद्धा एवढी होणार नाही अशी रक्कम!म्हणजे करोड.

अशा करोडो रुपयांची लागत लावून उभारलेली वास्तू म्हणजे मूलचे *छ.शिवाजी महाराज व्यापारी संकूल* अजून ना  त्याचा कुणी वाली आहे ना कुणी रखवाला. 

अशा छ.शिवाजी महाराजांच्या   नावाने उभारलेल्या  या संकूलाची तथाकथित तोडफोड , नासधूस, विद्रुपीकरण ऐन छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडावे ,हा  केवळमात्र योगायोग असणे अशक्यच आहे,हे विसरुन चालणार नाही.

*जनतेचा पैसा जनतेच्या हवाली करुन पालकमंत्री तर मोकळे झाले मात्र याची निगा राखण्याची जबाबदारी जेव्हा आपल्यावर आली तेंव्हा आपणच जर शांत राहिलो तर....?, की मला काय त्याचे म्हणत आपणही मूग गिळून गप्प राहायचे.

ही वास्तू पूर्ण होऊन नुकतेच २६जानेवारीला त्यांचे लोकार्पण तर केल्या गेले आहे मात्र त्याचे गाळे लिलाव प्रक्रियेत  असलेल्या कुठल्यातरी त्रुटींमुळे केवळ एकमेव गाळा कुण्या एका सामान्य माणसाने लाखोंची गुंतवणूक करुन घेतला आहे. याचा अर्थ अजूनही ६०गाळे आपल्या धन्याची वाटच बघताहेत,अशा या मूलमधील अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त मार्केट,व्यापारी संकुलाकडे व्यापाऱ्यांनी पाठ दाखविल्याने, मूल चंद्रपूर मार्गावर मुख्य रस्त्यावर असूनही हे संकूल आडमार्गावर असल्यागत मागे पडले आहे .

कुठल्याही प्रकारच्या पूर्वनियोजित आखणी शिवाय उभारलेल्या या वास्तूत कुठल्या प्रकारचा व्यवसाय ,अथवा कुठली प्रतिष्ठाने कार्यरत होऊ शकतात आणि ती कोणत्या मर्यादेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली जावीत ,यातून किती बेरोजगारांना फायदा करुन त्यांचा व्यवसाय  उभारण्यात मदत करता येईल याचा मागोवा न घेता मागणी केली ,पैसा आला , कुठल्यातरी शहरातील डिझाईन त्यासाठी वापरले , त्यानुसार बांधकाम केले आणि आज ते रस्त्यावर अक्षरशः उघडे नागडे पडले असून कुणाच्यातरी (वाईट नजरेचे/दगडाचे) निशाण्यावर आल्याचे विदारक चित्र उभे आहे.

यापूर्वी ही याच जागेवर मुख्य रस्त्यावर बांधलेले व्यापारी संकुल  विरोधकांनी उभे केले ते चुकीचे बांधकाम करुन केल्याचा आरोप  झाल्यानें बरीच वर्षे पडून राहिल्यानंतर सत्तेतील पदाधिकारी यांनी  आपल्या परिचयातील व जवळच्या लोकांना मिळवून दिल्याचा आरोपही अजूनही ताजाच असताना हा नवीन आरोप झेलण्याची वेळ आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांतील एक महत्वपूर्ण वास्तू त्यांच्या  स्वप्नातील  सुंदर वास्तू आज आपलेच गाऱ्हाणे मांडत फुटकी तावदाने दाखवित आहे.

काल दूपारपर्यंत बंद तावदानातून आपल्या असण्याचा गौरवांकीत अनुभव घेत  मोठ्या डौलात उभी असणारी ही वास्तू सायंकाळी मात्र आपल्या फुटक्या तावदानातून आतली शोभा आणि सौंदर्य चव्हाट्यावर आणत आहे.

तेरा करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली ही वास्तू जवळपास नऊ करोड रुपयांत तयार करून एक आदर्श निर्माण करणारा  व आपलीच पाठ थोपटून घेणारा बांधकाम विभाग आज या फुटक्या काचांचा सडा गोळा करताना यासाठी कुणाला जबाबदार धरणार? नगर प्रशासन या वास्तूची देखभाल व्यवस्थित करु शकली नाही तर ती यासाठी कुणावर दोषारोप करणार?मूलमधील इच्छुकांनी या गाळ्यांकडे पाठ फिरवली तर यासाठी कोणाला जबाबदार ठरवायचे? काच कशी फुटली आणि या प्रशस्त भव्यदिव्य वास्तुची शोभा झाली म्हणताना आरोपीच्या पिंजऱ्यात कुणाला उभे करायचे हा प्रश्न मूलच्या नागरिकांना पडला असून यासाठी कुणाला जबाबदार धरणार?याकडे साऱ्या नगरवासियांचे लक्ष लागले आहे.

*पैसा सुधीर मुनगंटीवार यांनी  आपल्या विकासकामांसाठी मंजूर करून आणला असेल, बांधकाम विभागाचे आपल्या अधिपत्याखाली या वास्तूचे बांधकाम करुन घेतले असेल, नगरप्रशासनाने यांचे वितरण करुन वाटपाबाबत काही ठोस उपाययोजना केली असेल , नागरिकांना ते पटले नाही म्हणून ही वास्तू आज आपल्या धन्याची वाटच पाहत असेल मात्र या वास्तूसाठी जनता जनार्दनाच्या पैशाचाच तर वापर केला गेला आहे ना?*

 त्याची अशी नासधूस , तोडफोड आपण या नगरातील नागरिक म्हणून खपवून घेणार आहोत काय? आज त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपलीही आहेच ना? म्हणूनच,

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल* च्या वतीने आपल्या शहरातील एका सुंदर वास्तूच्या झालेल्या या तोडफोडीला जबाबदार असणाऱ्यावर तातडीने  कार्यवाही करावी व शासकीय इमारतींचे संरक्षण करावे व जनतेच्या पैशातून उभारलेल्या वास्तूंचे जतन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*