आरसा...@विनोद देशमुख ---------------सुप्रियाचं 'मुख्यमंत्री' पद🤔

 🍳आरसा...@विनोद देशमुख

---------------सुप्रियाचं 'मुख्यमंत्री' पद🤔


शरद पवार स्थापित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पुतण्या अजितदादानं महाबंड केल्यामुळं साहेब आणि कन्या हादरले आहेत. आणि, प्रतिष्ठा सावरण्यासाठी बरंच काही बोलत आहेत. आपलं बोलणं कधी विसंगत होतं, तर कधी हास्यास्पद बनतं याचं भानही आता त्यांना राहिलेलं नाही, असं जाणवायला लागलं आहे.

परवा भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात घराणेशाहीवर हल्ला चढविताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले- "सोनियाजीको बेटेको पीएम बनाना है... शरद पवारजीको बेटीको सीएम बनाना है..." हे तसं राजकीय विधान आहे. त्याची दखल कोणी किती घ्यायची जे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातून गेलेले पवार मात्र शहांच्या या अभिप्रायानं कळवळले आणि खुलासा करते झाले- "अहो शहा, माझी मुलगी आमदार नाहीय्. ती खासदार आहे, खासदार."

या खुलाशाचे तीन अर्थ निघतात. पहिला, फक्त आमदारच मुख्यमंत्री बनू शकतो. दुसरा, खासदार मुख्यमंत्री बनू शकत नाही. तिसरा, खासदारानं पंतप्रधानच बनायचं असतं😀 हे तीनही अर्थ लक्षात घेतले तर पवारांच्या प्रदीर्घ अर्धशतकी राजकीय कारकीर्दीविषयी शंका यायला लागते. साहेब, आपण खरोखरच गंभीरपणे विचार केला का ? केला असता तर शहांना वरील उत्तर दिलं नसतं, असं आपल्याकडील लोकशाहीच्या कोणाही अभ्यासकाला वाटल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो की मंत्री असो, अमूक पात्रतेचाच माणूस हे पद ग्रहण करू शकतो, अशी कुठलीही अट आपल्याकडे नाही. अट आहे ती ही की, असं पद स्वीकारणाऱ्याला केन्द्रात लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी एका सभागृहाचं आणि राज्यात विधानसभा किंवा विधान परिषद पैकी एकाचं सदस्यत्व सहा महिन्यांच्या आत मिळवावं लागतं. तसं झालं नाही तर नवीन पद सोडावं लागतं किंवा ते बरखास्त केलं जातं. त्यामुळं अशा पदावर जाणारा इसम सध्या कोणत्या पदावर आहे याचा काहीही संबंध नसतो. यातून एक स्पष्ट खुलासा होतो की, शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे खासदार असतानाही मुख्यमंत्री बनू शकतात. त्यामुळं पवारांनी शहांना दिलेलं उतर गैरलागू आणि धूळफेक करणारंच आहे. नव्हे, घराणेशाहीच्या मुद्याला सरळसरळ बगल देणारं आहे.

महाराष्ट्रातच घडलेलं उदाहरण पाहू या. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण "आदर्श" घोटाळ्यात अडकल्यामुळे २०१० मध्ये बदलण्याचा प्रश्न आला, तेव्हा कॉंग्रेसनं नाव पुढे केलं पृथ्वीराज चव्हाण यांचं. ते राज्यसभेचे खासदार होते. त्यांना दिल्लीतून मुंबईत आणून मुख्यमंत्री बनविण्यात आलं आणि नंतर ते कराडचे आमदार म्हणून निवडून आले. स्वत: पवार या घडामोडीचे साक्षीदार होते आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष यात सहभागीच होता. तरीही पवार आज 'कन्याप्रेम' लपवण्यासाठी खासदारपदाचा नसलेला मुद्दा काढत आहेत. छातीठोकपणे सांगा ना. "हो, मुलीला मुख्यमंत्री झालेलं पाहणं हे माझं स्वप्न आहे." (पण त्यात घराणेशाही नसेल. आमचा पक्ष तिची निवड एकमतानं, लोकशाही पद्धतीनं करेल.) किस्सा खतम, बात हजम🤣

पण, ते न करता पवार उगाच "मी नाही त्यातली..." नाटकाचा प्रयोग सादर करीत आहेत. अहो काका, सारं जग जाणतं की, मुलीला पुढं सरकवण्याच्या तुमच्या चाली पाहूनच अजितदादानं महाबंडाचा झेंडा फडकवला आणि तुमची घराणेशाही पवारांच्या दुसऱ्या पातीत नेली. त्याचं दु:ख आम्ही समजू शकतो. पण, नसलेली पूर्वअट सांगून शहांची अन् लोकांची थट्टा का करता ? तशीही तुम्ही लोकांनी लोकशाहीची थट्टा चालविलेलीच आहे. ती पुरेशी नाही का😣 

++++++++++

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*