आरसा...@विनोद देशमुख --------------एक तुतारी द्या मज आणुनि...

 🍳आरसा...@विनोद देशमुख

--------------एक तुतारी द्या मज आणुनि...


काका शरद पवार यांच्या मालकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुतण्या अजितदादा पवार यांनी केलेल्या महाबंडामुळे निर्माण झालेला "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरच्चंद्र पवार" आता नव्या पक्षचिन्हासह मैदानात येत आहे. 

निवडणूक आयोगाने घड्याळ हे मूळ पक्षचिन्ह पुतण्याला दिल्यानंतर, आता काकाच्या मूळ गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवे चिन्ह देऊ केले आहे.‌ परिणामी राष्ट्रवादीचे दोन आवाज यापुढे वाजतील-घड्याळाची टिकटिक अन् तुतारीचा आवाज. 

काय दिवस आले पाहा.‌ घराचे वासे फिरतात म्हणे. येथे घड्याळाचे काटे फिरले😀 अन् तुतारी हाती आली. बसा फुंकत. केशवसुत लिहून गेले आहेत-


एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकिन मी जी स्वप्राणाने

जितेन्द्र आव्हाड वगैरे मंडळींना आता तुतारी फुंकत फिरावे लागणार आहे. निवडणुकीत मते मागायची आहेत ना. नवीन चिन्हाचा प्रचार करावाच लागेल. आघाडीवरची नेते मंडळीही हातात तुताऱ्या घेऊन फुंकताना जागोजागी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात प्रस्थापित पक्ष आणि चिन्ह बदलले की थोडे जडच जाते. सहानुभूतिदार अन् मतदार यांच्या गळी हे नवत्व उतरवावे लागते. त्यादृष्टीने शपगटाने पहिल्याच दिवशी आपल्या चिन्हाचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडून आज प्रत्यक्ष रायगडावरच तुताऱ्या फुंकण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचा किती लाभ होतो ते भविष्यात दिसेलच.

चिन्ह प्रसिद्ध करण्यासाठी साजेशा, चटपटीत घोषणाही लागतात. इंदिरा गांधी काँग्रेसमधून फुटून निघाल्यानंतर, बैलजोडीच्या तोलामालाचे गाय-वासरू हे चिन्ह त्यांनी घेतले. त्याकाळात दिली जाणारी एक घोषणा- "गाय-वासरू, नका विसरू". (यावरून इंदिरा-संजय असे साम्य दाखवत टिंगलटवाळीही झाली.) त्याच्या कितीतरी आधी धनुष्यबाण चिन्हानेही एक मजेदार घोषणा जन्मास घातली होती.

धनुष्यबाण म्हटले की शिवसेना असे समीकरण मराठी माणसाच्या डोक्यात फिट आहे. पण, मुळात हे चिन्ह ओपन होते. अपक्ष लढणारे जुने राजे आणि आदिवासी पट्ट्यांमधील नेते हमखास धनुष्यबाण, सिंह, वाघ वगैरे चिन्ह घ्यायचे. शिवसेनेच्या जन्माआधी १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष, पण कॉंग्रेसविरोधकांचे संयुक्त उमेदवार होते गोंडराजे लाल श्यामशहा लाल भगवानशहा. त्यांनी चिन्ह घेतले होते धनुष्यबाण. काँग्रेस (बैलजोडी) आणि रिपब्लिकन (हत्ती) हे प्रमुख पक्ष शर्यतीत होते. लाल श्यामशहाच्या प्रचारकांनी घोषणा दिली- " छोडो तीर छोडो बाण, हत्ती-बैल दाणादाण". ही घोषणा एवढी आकर्षक ठरली की, लाल श्यामशहा 'बाहेरचे' (म्हणजे राजनांदगावचे) असूनही विजयी झाले. काँग्रेसचा मतदारसंघ त्याकाळात हिसकून घेण्याची कमाल अचूक प्रचाराने दाखवून दिली. पण--

याच अनोख्या विजयाने लोकसभेच्या इतिहासात एका नकारात्मक आणि असांसदीय निर्णयाची नोंदही केली, ही या निवडणुकीची दुसरी बाजू. लोकसभेत पहिल्याच दिवशी राजे लाल श्यामशहा यांनी आदिवासींसाठी स्वतंत्र गोंडवाना राज्याची मागणी केली आणि तिची दखल न घेतली गेल्याच्या निषेधार्थ खासदारकीचा राजीनामा दिला. तो मंजूर होईपर्यंत अवघे १० दिवस ते खासदार राहिले. भारतीय संसदेच्या इतिहासात इतका कमी वेळ सदस्य राहिलेले ते एकमेव खासदार आहेत. पुढे १९६४ मध्ये पोटनिवडणूक होऊन गोपिकाताई मारोतराव कन्नमवार यांनी ही जागा कॉंग्रेसकडे परत आणली. याचा अर्थ, प्रस्थापितांची दाणादाण तर झाली, पण बाण वाया गेला. असो.

यावेळी महाराष्ट्रात (शिंदे) शिवसेनेचा धनुष्यबाण, (दादा) राष्ट्रवादीचे घड्याळ आणि भाजपाचे कमळ एकीकडे, तर (उबाठा) शिवसेनेची मशाल, (शप) राष्ट्रवादीची तुतारी आणि कॉंग्रेसचा पंजा दुसरीकडे असा खो खो चा खेळ होणार आहे. यात शपगटाचे नेते-कार्यकर्ते तुतारी प्राणपणाने फुंकणार का, त्यांच्या तुतारीच्या आवाजाला लोक प्रतिसाद देणार का ते दिसेलच. तरीही, मुख्य मुद्दा राहणार आहे तो हाच की-

दादाचं घड्याळ, काकाची तुतारी

कोण पडतोय् कोणाला भारी ?

++++++++++

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*