*आठवले ते सांगितले..**तपस्वी कलासाधक राजदत्तजी..*

*आठवले ते सांगितले..*  *तपस्वी कलासाधक राजदत्तजी..*



२५ जानेवारीच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास वृत्तवाहिनीवरील बातम्या बघत असताना अचानक पद्म पुरस्कारांची घोषणा करणारी बातमी दाखवली गेली. त्यात ख्यातनाम  चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी ऐकली. बातमी निश्चितच आनंददायी होती. लगेचच राजदत्तांना फोन लावायला घेतला खरा. पण मग विचार केला की रात्रीचे अकरा वाजत आहेत. आता बहुतेक ते झोपले असावेत इतक्या वयोवृद्ध व्यक्तीला त्रास का द्यावा असा मी विचार केला.उद्याच बोलूया असे म्हणून फोन ठेवला. काल दुपारी त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांचे अभिनंदनही केले.


राजदत्तजींचा माझा संबंध काही आजचा नाही. त्यांचे नाव तर मी कधीचे ऐकत होतो. मात्र त्यांचा प्रत्यक्ष परिचय १९८८ च्या दरम्यान झाला. त्यावेळी नागपुरात रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ.  हेडगेवार वरील लघुपटाचे चित्रीकरण करायला राजदत्तजी आले होते. त्या काळात मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो.१६ एमएम सेल्युलॉईड फिल्म वर आम्ही वृत्तचित्रण करायचो. त्यावेळी माझ्याकडे १६ एमएम चा पाइलार्ड बोलेक्स कॅमेरा होता. अचानक एक दिवस रेशीमबाग संघ कार्यालयातून फोन आला. राजदत्तजी चित्रीकरण करीत आहेत. त्यांचे कॅमेरामन म्हणून फिल्म डिव्हिजनचे निवृत्त अधिकारी बाळ बापट आलेले आहेत. त्यांचा कॅमेरा त्रास देतो आहे. तेव्हा तुम्ही कॅमेरा काही वेळासाठी उपलब्ध करून देऊशकाल काय? अशी मला समोरच्या व्यक्तीने विचारणा केली. या निमित्ताने राजदत्तसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाशी परिचय होत असेल तर जायला काय हरकत आहे असा विचार करत मी निघायची तयारीच केली. हा विचार मी माझ्या वडिलांनाही सांगितला. माझे वडील कै. विष्णुपंत पाठक आणि बाळ बापट हे दोघेही यवतमाळ मध्ये शाळेत बरोबर शिकलेले होते. त्यांचे नाव कळल्यावर वडीलही माझ्याबरोबर चालतो म्हणाले. आम्ही दोघेही स्कुटरने रेशीमबागला पोहोचलो. त्यावेळी बाळ काका बापट यांनी माझी आणि राजदत्तजींशी ओळख करून दिली. त्यांना बघून मला धक्काच बसला. चित्रपट दिग्दर्शक म्हणजे माझ्या नजरेसमोर एक वेगळेच चित्र होते. त्याला धक्का देणारे हे व्यक्तिमत्व होते. मध्यम देह यष्टीचे काळे सावळ्या रंगाचे साधारणपणे ६०-६५ वर्ष वयोगटातली ही व्यक्ती एखाद्या महानगरपालिकेतल्या शाळेच्या शिक्षकांसारखी दिसत होती. पांढरे शुभ्र धोतर आणि इस्त्री नसलेला जाडा भरडा कुर्ता, वाढलेली दाढी आणि डोक्यावर टक्कल अशा वेशात असलेले राजदत्तजी आपल्या चित्रीकरणाच्या धावपळीत व्यस्त होते. ही त्यांची आणि माझी पहिली भेट होती. त्यादिवशी त्यांच्या व्यस्त धावपळीतच माझ्या त्यांच्याशी गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशीही मी त्यांना भेटायला गेलो होतो. योगायोगाने बाळकाकांचा कॅमेरा दुरुस्त झाला होता. त्यामुळे माझा कॅमेरा वापरण्याची वेळ आली नाही.


यावेळी एकमेकांच्या फोन नंबरची देवाणघेवाण झाली होती. त्यामुळे अधून मधून त्यांच्याशी फोनवर संपर्क करू लागलो. त्या काळात मी दूरदर्शनसाठी मालिका आणि वृत्तपट बनवण्यासाठी धडपडत होतो. त्यात कधी अडचण आली की त्यांना हमखास फोन करायचो ‌.ते प्रतिसादही द्यायचे. मला आठवते १९९० च्या ऑक्टोबर महिन्यात दूरदर्शन ने नव्या मालिकांसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यावेळी शिवकथाकार विजय देशमुख यांच्या सिंहासनाधीश्वर या नाटकावर तेरा एपिसोड ची मालिका बनवावी असा माझा प्रस्ताव होता .माझा एक सहकारी नंदू शिंदे काही कामाने मुंबईला जाणार होता. तो मुंबईला गेल्यावर त्याची राजदत्तांची भेट झाली. तिथे त्याने सिंहासनाधीश्वर मालिका तुम्ही दिग्दर्शित कराल काय असा प्रश्न विचारला. राजादत्तजींनी तात्काळ होकार दिला आणि तिथेच एक कागद घेऊन संमती पत्र तयार करून दिले. लगेचच माझा मित्र नंदू शिंदे ला ते मला पोस्ट करायला सांगितले. हे पत्र लावल्याशिवाय प्रस्ताव पुढे सरकणार नाही असेही त्यांनी सांगितले. ते पत्र हातात पडताच माझा उत्साह दुणावला. त्याचबरोबर इतका मोठा दिग्दर्शक एका शब्दावर मानधनासंदर्भात काहीही न विचारता लगेच तयार झाला म्हणून माझा त्यांच्याबद्दलचा आदरही दुणावला.


नंतर अधून मधून त्यांचा संपर्क येतच राहिला. दुर्दैवाने सिंहासनाधीश्वर चा प्रकल्प पुढे सरकला नाही. मात्र राजदत्तजींच्या भेटी होत राहिल्या.१९९३ मध्ये नागपूरच्या सारथी या संघटनेने त्यांना पुरस्कार देऊन गौरवित केले होते. हा पुरस्कार स्वीकारावा म्हणून मीच त्यांना विनंतीचा फोन केला. राजदत्तजींनी लगेचच होकार दिला. ते ठरल्या दिवशी नागपुरात आले आणि त्यांनी आनंदाने पुरस्कार स्वीकारला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजदत्तजी आणि सुरेश द्वादशिवार सर माझ्या कार्यालयात गप्पा मारायला आले होते. बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या .


साधारणपणे १९९५ नंतर मी दूरदर्शन चे काम सोडून मुद्रित माध्यमात आलो. तेव्हापासून त्यांचे माझे संपर्क कमी झाले. एकदा अचानक मुंबईला विधानभवनात ते भेटले. अधिवेशन सुरूच होते. तिथेच थोडावेळ आमच्या गप्पा रंगल्या.


राजदत्तजी एक गाजलेले चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. मात्र त्यांच्याशी बोलताना आपल्या एखाद्या  मित्राशी बोलावे इतक्या सहजतेने ते बोलतात. कधीही आपल्या अनुभवाचा किंवा ज्ञानाचा अहंभाव त्यांच्या वागण्या बोलण्यात जाणवत नाही.


साधेपणा कसा असावा हे राजदत्तजींकडे पाहून कळते. मला आठवते पहिल्यांदा त्यांना रेशीम बागेत भेटलो तेव्हा तिथे एक मेकअप मन आला होता. बाळकाकांनी सांगितले की त्याला विमानाने आणावे लागले. त्यावेळी ते म्हणाले की आमचा डायरेक्टर दत्ता (म्हणजे

राजदत्तजी रेल्वेने विना रिझर्वेशन बोगीच्या कॉरिडॉर मध्ये बसून येतो. मात्र मेकअप मन विमानाने आणावा लागतो. इथे राजदत्तजींचा साधेपणा लक्षात आला.


सारथीच्या कार्यक्रमासाठी ते आले त्यावेळी देखील ते सेकंड क्लासने झाले होते. आयोजकांनी तिथे पोहोचल्यावर त्यांना ठरल्याप्रमाणे दोन्ही परतीचे प्रथम श्रेणीचे भाडे लिफाफ्यात टाकून देऊ केले. राजदत्तजींनी लिफाफा उघडून रक्कम मोजली आणि त्यांनी फक्त सेकंड क्लासच्या तिकिटापुरते पैसे ठेवले. बाकी पैसे आयोजकांना वापस केले. इथेही त्यांचा साधेपणा आणि सच्चेपणा दिसून आला. नागपुरात आले की ते संघ कार्यालयात उतरायचे आणि कुठेही जायचं असलं तर तिथलीच एखादी स्कूटर उचलून निघायचे. मी इतका मोठा दिग्दर्शक आहे तेव्हा मला कार हवी असा अट्टाहास त्यांनी कधीच केला नाही. माझ्या स्कुटरवर कांहीं वेळा ते डबलसिट सुद्धा फिरले आहेत.माझ्या आठवणीप्रमाणे २००८साली मे महिन्यात भर दुपारी एकदा माझ्या पुतणीला अमरावतीला जायचं म्हणून सोडायला रवी नगर चौकातल्या बस स्टॉप वर गेलो होतो. त्या बस मध्ये अचानक चढण्यासाठी राजदत्तजी आलेले दिसले. त्यांना बघून मी चक्रावलोच. कुठे निघालात असे विचारले असता अमरावतीला एका बैठकीला चाललो आहे असे उत्तर त्यांनी दिले. मग कारने का गेला नाहीत असे मी विचारले असता ही बस काय वाईट आहे असा प्रश्न विचारून हसत हसत ते बसमध्ये चढले.


साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्त्वाने वयाची  वर्षे जगतआलेले राजदत्तजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत. त्यांना फोन केला की त्याबद्दल चर्चा निघतेच. मुळातच त्यांचा सगळ्यांना मदत करण्याचा स्वभाव आणि त्यात संघाचे संस्कार असल्यामुळे कधीही कोणतीही मदत मागण्यासाठी त्यांना फोन केला की ते लगेच तयारच असतात. मी जेव्हा जेव्हा त्यांना मदतीसाठी फोन केला तेव्हा त्यांनी कधीही निराश केले नाही हे खरे.  वर्षभरापूर्वीच त्यांच्याकडून एक प्रशस्तीपत्र हवे होते. तेव्हा लगेच व्हाट्सअप वर मसुदा पाठव, मी पत्र तयार करून पाठवतो असे सांगितले, आणि चौथ्या दिवशी माझ्या हातात पोस्टाने पत्र पडले होते.


राजदत्तजी आज ९२ वर्षाचे आहेत. सुरुवातीला काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. नंतर चित्रपट क्षेत्रात आले एक कर्मठ तत्त्वनिष्ठ दिग्दर्शक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. खरे तर त्यांना पद्मश्री पद्मभूषण असे पुरस्कार फार पूर्वी मिळायला हवे होते. मात्र उशिरा का होईना पण त्यांच्या तपस्वी साधनेचा गौरव होतो आहे ही माझ्यासारख्या त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.


राजदत्तजींचे या निमित्ताने हार्दिक अभिनंदन. राजदत्तजी हे वैदर्भीय आहेत. वर्धा जिल्ह्यात त्यांचे बालपण गेले आहे. एक वैदर्भीय माणूस मुंबईत राहून आपले साधेपण जपत चित्रपटसृष्टीत एका उंचीवर पोहोचतो याचा एक वैदर्भीय म्हणून मला निश्चितच अभिमान आहे. त्यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे आणि वयाची शंभरी गाठावी यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.


 अविनाश पाठक


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*