मूल मध्ये उभे राहणार १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय*

 *मूल मध्ये उभे राहणार १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय*

*ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे १०७ कोटी २९ लक्ष मंजूर*


*प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी*

चंद्रपूर, दि. २८: न्यूज ब्युरो 

 जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यात, येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, मुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मूल येथीाल ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे  १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मूल येथे आता १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने १०७ कोटी २९ लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे. 


सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय ५० खाटांचे आहे. या रुग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता मूल येथे १०० खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर तीन माळे असे एकूण १५ हजार चौ. मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी ४ मजली निवासस्थान राहणार आहे. तसेच १०० खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती या रुग्णालयासाठी करण्यात येईल. यामध्ये नेत्रतज्‍ज्ञ, बालरोगतज्‍ज्ञ, स्त्रीरोगतज्‍ज्ञ, अस्थिरोगतज्‍ज्ञ, सर्जन, भूलतज्‍ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी एकूण  १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका, तांत्रीक पदेसुद्धा पदे निर्माण होतील.


*रुग्णालयामध्ये राहणार अत्याधुनिक सोयीसुविधा* : रुग्णालयामध्ये नवीन विशेषउपचार कक्ष, सर्व प्रकारच्या विशेषज्‍ज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होईल. या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण करण्यात येणार आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेष उपचार कक्षाकरिता आधुनिक  वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच  एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज माता-बाळ उपचार यंत्रणा, अपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधनसामुग्री, बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे.  गंभीर शस्त्रक्रियेसाठी आय.सी.यू, मॉड्यूलर ऑपरेशन कक्ष, महिला, पुरुष व बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष, मॉड्यूलर औषधी वितरण कक्ष, ब्लड बँक, आयुर्वेद, युनानी व होमीओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतररुग्ण सेवा, पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या उपाययोजना राहणार आहे.


*रुग्णांच्या नातेवाईकांसाठीसुध्दा सुविधा* : रुग्णालयात रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांसाठी जेवणाची, बसण्याची व आराम करण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रतिक्षा कक्ष, नातेवाईकांसाठी स्वतंत्र शौचालय, आंघोळीकरीता बाथरुम, रुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था राहणार आहे.

या निर्णयावर समाजमाध्यमांवर काही प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्यांचीही शहानिशा केली जाणे आवश्यक आहे.... ,तर आणि तरच ह्या नवीन सोयीसुविधांचा जनतेला खऱ्या अर्थाने लाभ होईल अन्यथा ह्याच जनतेतील काही जण पराचा कावळा केल्यावाचून राहणार नाहीत ,हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया:-

 कौतुकास्पद... भविष्याचा जीवन मरणाचा प्रश्न मार्गी लागेल असे द्विगुणित विश्वाभास होत आहे... मूल करीता आराध्य दैवत ठरणारे आणि विकास म्हणजे काय याचे प्रॅक्टिकल करून शिक्षित करणारे गुरू दैवत मा. ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांचे शत शत आभार.... 🙏

खंत:-

सुधीर भाऊ कडून जे सुविधा येत आहे त्याची अत्यंत गरज आहे आपल्याला परंतु आता जे सुविधा आहे उत्तम आहे अस मला वाटत नाही आम्ही मुल मध्ये राहतो केव्हा स्वतच्या घरचे किंव्हा इतर नागरिकाला घेऊन जातो परंतु समाधान कारक इलाज होत नाही रात्रीच्या पाडीत डॉकटर दवाखान्यात राहत नाही कुठे तरी वेगळ्या ठिकाणी झोपतो ,यायला उशीर होते त्या मुळे अडचण होते आता सुधीर भाऊ जे नवीन सुविधा आणत आहे त्यात पुन्हा एक नियम करायला पाहिजे की दवाखाण्यात ज्या वेळेस ज्या कर्मचारी ची पाळी आहे मग ते डॉकटर असो की दुसरा कर्मचारी ते त्या वेळेस तिथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*