संस्कृत साहित्यातील रामायणे वैज्ञानिक अंगाने अभ्यासणे गरजेचे... डॉ चंद्रगुप्त वर्णेकर..*

 *संस्कृत साहित्यातील रामायणे वैज्ञानिक अंगाने अभ्यासणे गरजेचे... डॉ चंद्रगुप्त वर्णेकर..*


नागपूर. २१ जानेवारी., न्यूज ब्युरो 

संस्कृत साहित्यात फक्त वाल्मिकी कालिदासाचेच नाही तर एकूण ६५ रामायणे उपलब्ध आहेत. ही सर्व अभ्यासताना या सर्व कवींनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून रामायणाची रचना केली असे लक्षात येते. त्यामुळे अभ्यासकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून संस्कृत साहित्यातील रामायण अभ्यासल्यास त्याचा आजच्या वैज्ञानिक युगात फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन संस्कृत साहित्याचे अभ्यासक डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर यांनी केले.


अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांचे संयुक्त विद्यमाने संस्कृत साहित्यातील रामायण या विषयावर डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर यांचे व्याख्यान राम नगर चौकातील श्री राम मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम संस्कृत विदुषी आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या निवृत्त अधिष्ठाता डॉ. नंदा पुरी या होत्या.


यावेळी बोलताना डॉ. वर्णेकर म्हणाले की आपल्याला फक्त कालिदास, भवभूती, वाल्मिकी, असे मोजकेच कवी ज्ञात आहेत. मात्र अठराही पुराणांमध्ये रामायण आहे. महाभारतातही रामायण आहे. जैन साहित्यात, बौद्ध साहित्यातही रामायण आहे. भास भट्टी मुरारी अशा वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या रचना केल्या आहेत. रामायणातील विविध पात्रांना आणि विविध प्रसंगांना उद्देशूनही या रचना झाल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.


रामायण काळातही पुष्पक विमान होते. त्या काळात युद्धात विविध शस्त्रे आणि अस्त्रे वापरली गेली होती. विविध औषधी वनस्पतींचाही उल्लेख रामायणात सापडतो, याकडे लक्ष वेधत डॉ. वर्णेकर म्हणाले की वैज्ञानिक अंगानेही रामायणाचा अभ्यास होणे गरजेचे आहे. संस्कृत साहित्यातील ही विविध रामायणे अभ्यासून आजच्या वैज्ञानिक संशोधनाशी त्याचा ताळमेळ जुळवल्यास ते  मानवजातीसाठी हिताचे राहू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.


संस्कृत साहित्यात वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या अंगाने रामायणातील व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. कुणी पात्रांचे उदात्तीकरण केले आहे, तर कुणी प्रसंगांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्या त्या अंगाने सर्व रामायणे अभ्यासली जायला हवीत असे प्रतिपादन डॉ. नंदा पुरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या साहित्यात केवळ लालित्य नाही तर व्याकरणही आहे याकडे लक्ष वेधत त्या अंगानेही अभ्यास व्हावा असे त्यांनी सुचवले.


या कार्यक्रमात एका रामगीताचेही लोकार्पण करण्यात आले. कवयित्री श्रद्धा कश्यप यांनी राम मंदिर लोकार्पण आणि प्रभू रामचंद्राची राम मंदिरात प्रतिष्ठापना या संकल्पनेवर पधारो राम बिराजो राम हे हिंदी गीत शब्दबद्ध केले आहे. या गीताला स्वरसाज ख्यातनाम संगीतज्ञ डॉ. तनुजा नाफडे यांनी चढवला असून पुष्कर देशमुख यांनी संगीत संयोजन केले आहे. डॉ. तनुजा नाकडे यांनीच हे गीत गायले आहे. या गीताचा व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध करण्यात आला आहे.  या गीताचे लोकार्पण याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गीताचा व्हिडिओ देखील प्रदर्शित करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यावर अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विशद करत सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख अतिथींचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केल्यानंतर डॉक्टर तनुजा नाफडे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साहित्य परिषदेचे  महामंत्री एड. सचिन नारळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. सुरुची डबीर यांनी केले. या कार्यक्रमात साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष ऍड.लखनसिंह कटरे यांनी लिहिलेल्या आडवळणावरील काही स्थानके या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे सचिव राजीव काळेले साहित्य परिषदेचे अध्यक्ष एड. लखन सिंह कटरे अविनाश पाठक सचिन नारळे प्रभृती उपस्थित होते. कार्यक्रमाला ख्यातनाम सूत्रसंचालक प्रकाश एदलाबादकर मुकुंद सरमोकदम, शशिकांत सुरंगळीकर, स्वाती सुरंगळीकर, सुरेश खेडकर, राजेश पेंढारी, विनोद जोशी प्रभृत्तींसह मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*