"राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम"(Nation First , Always First)

 "राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम"(Nation First , Always First)


"ज्याचं मुकुट आहे हिमालय,जिथे वाहते गंगा,

जिथे आहे विविधतेत एकता आणि सत्यमेव जयते चा नारा,

तोच आहे भारत देश माझा !!"

राधिका देशपांडे.



किती ते भारतमातेचे वर्णन, करावे तेवढे कमीच.

आजपासून ७६ वर्षांपूर्वी आपण सारे अर्थातचं संपूर्ण भारवर्ष एका मोठ्या मोहिमेला फत्ते करून विजय जल्लोष साजरा करीत होतो. १५ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा दिवस.दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य  स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक आणि आपल्या भारतीयांच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.यंदाच्या स्वतंत्र दिनाची theme *Nation First, Always First (राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम)* असणार आहे .केंद्र सरकारने देशभरात *हर घर तिरंगा* अभियानाची दुसरी आवृत्ती सुरु केली आहे .याशिवाय _' माझी माती ,माझा देश_ ' ही मोहीम देखील राबविण्यात येत आहे.



राष्ट्रभक्तीची नेमकी व्याख्या करता येणार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने देशभक्ती करत असतो. देशभक्तीला एका तराजूत तोलता येत नाही. विविधतेने नटलेल्या भारतासारख्या देशात आज शांतता, सुव्यवस्था, लोकशाही सुखाने नांदते आहे. आपण सर्व भारतीय भारत नावाच्या धाग्यात गुंफलेले आहोत. आपली लोकशाही हेच आपलं बळ आहे. या लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी झटणं ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रभक्तीचं!

भारत हा आपला देश, आपली अस्मिता.. भारत नावाच्या धाग्यात आपण सर्व भारतीय गुंफलेले आहोत. विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्टय़. या पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने नांदतात. असंख्य जाती, धर्म, भाषा, बोलीभाषा, संस्कृती असतानाही आपल्याला भारतीय म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो. देशावरच्या संकटात प्रत्येक भारतीय नागरिक एक होतो. त्यावेळी त्याला आपला धर्म, जात प्रिय नसते. त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो आपला देश, आपल्या देशाचं स्वातंत्र्य. म्हणूनच देशावर जीव ओवाळून टाकायलाही तो मागे-पुढे बघत नाही. तसं पाहायला गेल्यास भारतातल्या प्रत्येक नागरिकांची श्रद्धास्थानं वेगळी. भक्तीच्या पद्धतीही वेगळ्या. कोणी मातृभक्ती करतं तर कोणी गुरुभक्ती.. कोणी त्या जगनियंत्या परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होतं, तर कोणाला आपलं कर्म श्रेष्ठ वाटतं. भक्तीच्या या ना ना तऱ्हा, ना ना रूपं. पण सर्वांमध्ये राष्ट्रभक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग मनामध्ये चेतवलं की प्रत्येक सर्वसामान्य नागरिक या भारतमातेचा शूर सैनिक बनून जातो.



आज भारतात नागरिकता सुधारणा कायद्यावरून प्रचंड गदारोळ माजला आहे. अनेक राज्यांमध्ये नागरिकांनी दगड हाती घेतला. जनतेचे रक्षक असणा-या पोलिसांनाचं पळता भुई थोडी केली.

कायद्याचा विरोध करणा-या गर्दीला बघून पळणाऱ्या, दगडांच्या माऱ्यामुळे जखमी झालेल्या पोलिसांची अवस्था मन विषण्ण करून गेली. आपल्याला लोकशाहीने विरोध करण्याचा अधिकार दिला आहे. पण हा विरोध शांततेच्या मार्गाने होणं गरजेचं आहे. विरोध करण्याचे अनेक मार्ग आहेत. सरकारवरचा रोष मतपेटीतूनही व्यक्त करता येतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान हे देशाचं आणि पर्यायाने आपलं नुकसान आहे हा विचार नागरिकांमध्ये रुजायलाचं हवा. संस्कृती आपल्याला सनदशीर मार्गाचा अवलंब करायला शिकवते. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनांना, गैरसमजुतींना, अपप्रचाराला बळी न पडता सारासार विवेकबुद्धी जागृत ठेऊन लोकशाहीचा हा पाया अधिक भक्कम करण्यासोबतच त्यावर कळस चढवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने झटायला हवं. आपण लोकशाहीचे आणि या भारतमातेचे पाईक आहोत, ही भावना मनात असेल, तर आपल्या हातून कधीही गैरकृत्य घडणार नाही. महत्प्रयासाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे. ते टिकवण्यासाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो.

जेव्हा प्रत्येकजण मनापासून आपल्या राष्ट्राला वंदनीय मानून सगळे मतभेद दूर सारून देशासाठी एकत्र होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक राष्ट्र श्रेष्ठ राष्ट्र बनून 'राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम' ची संकल्पना खऱ्या  अर्थाने अंमलात आणू शकतो.

सर्व मिळून एक प्रण करुया!! 



आम्ही सारे भारतवासी,

एवढं एकचं भान राखू

असू कुठेही जगावरती

तिरंग्याची शान राखू|| 


जय हिंद, जय भारत!!

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*