बाजार समिती निवडणूकीचा बाजार!

 बाजार समिती निवडणूकीचा बाजार!

बाजाराला जाऊ या,काय घडणार ते पाहू या.

दीपक देशपांडे.

चंद्रपूर जिल्ह्यातील १२बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्येकी १८प्रमाणे २१६ जागांसाठी निवडणूक २८ व ३० एप्रिल रोजी होऊ घातली आहे. 

२७मार्चरोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आणि निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले.सुरुवातीला एकीकडे  नामांकनपत्र विक्री संथगतीने सुरु होती ,तर दुसरीकडे विविध राजकीय पक्ष आपापल्या पक्षाची रणनीती आणि इच्छुक उमेदवार व  कुणी कुणासोबत युती,आघाडी करायची आणि कुणी कुणाविरुद्ध दंड थोपटायचे यावर मंथन करण्यातच बराच काळ निघून गेला ,मात्र पर्याप्त निष्कर्ष काढता आला नाही .परिणामी अंतर्गत कलह उघड झाला आणि त्याची परिणिती म्हणून आपलेच आपल्याच्या विरोधात उभे ठाकलेत. आणि बेसुमार नामांकनपत्र दाखल करण्यात आले तरीही कोणाचे कोणाशी गठबंधन होणार ,कोण कुणाच्या विरोधात हे काही स्पष्ट होत नव्हते. मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीत ज्यांनी हुशारी केली होती आणि ज्यांचेजवळ संख्याबळ अधिक आहे त्यांची सरशी होऊन आघाडी तेच घेणार हे मात्र समजत असताना पक्षांतर्गत कलहातून कोणाजवळ किती संख्याबळ हे काहीसे अस्पष्ट असल्याने तुल्यबळ लढती होतील अशी आशा निर्माण झाली होती.

नामांकनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र विक्रमी नामांकनपत्र परत घेतली गेली आणि काही ठिकाणी निवडणुकीतील चुरसच संपून गेली तर काही ठिकाणी ती हेतुपुरस्सर संपविण्याचा प्रयत्न केला गेला. तर काही ठिकाणी आपलेच आपल्या स्वकियांविरोधात दंड थोपटून न जाणे केंव्हाची दुश्मनी काढत भिडलेले दिसू लागलेत.

नेतृत्वाची आणि वर्चस्वाची लढाई सुरू झाली तेंव्हा नामांकनपत्र परत घेताना शेपट्या गुंडाळून बसलेली मंडळीआणि पडद्याआडून खेळात रंग भरणारी मंडळी  पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा भास निर्माण करीत जनतेसमोर दिखावा करण्यासाठी पुढे झाली मात्र या वेळी मतदार, जनता आणि राजकीय वर्तुळात हा काय प्रकार आहे हे सर्वश्रुत असताना अनैतिक गठबंधन बघून या राजकीय मंडळींच्या मुख्य हेतूचा संशय न आला तरच नवल.

एका ठिकाणी परस्परांशी विरोधात लढायचं आणि दुसऱ्या ठिकाणी गळ्यात गळे घालून फिरायचे ह्या प्रकाराला जनता कंटाळली असून अशा परस्परविरोधी विचारांची माणसं एकत्र येतात तेंव्हा त्यांच्या कार्यकर्तुत्वाची खरी ओळख जनतेला होते आणि सत्तासंघर्षात केवळ जनतेला मुर्ख समजण्याचा हा प्रकार असल्याचे उघड होते.

सगळ्यांना केवळ सत्ता आणि खुर्ची हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी हे राजकारणी सर्वसामान्य माणसाला निवडणुकीच्या बाजारात नवनवीन आमिषे दाखवून केवळ लुबाडण्याचा प्रयत्न करताहेत हे स्पष्ट होते आणि मग भाव ठरवण्याची अहमहमिका सुरु होते आणि एकेका मतदाराची नड पाहून किंमत लावली जाते आणि वेगवेगळ्या आमिषाने एकेक मतदार खरेदी केला जातो तर काही मतदार हे भिती व दबावतंत्राचा वापर करुन पर्यटनाच्या नावाखाली अपहरण करुन बंदिस्त केले जातात ,हा खेळ केवळ सत्ता हस्तगत करणे हा एकमेव उद्देश पुढे ठेवून केला जातो. 

कुणी याला नावबोटं ठेवतात परंतू याच कारणाने मग काही सुशिक्षित समजले जाणारे मतदारही आपल्या मतांची किंमत ठरवून ती रक्कम प्राप्त झाली की नैतिकता धाब्यावर बसवून मत दान नाही तर मत विक्री करतात . 

बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारांचे अघोषित अपहरण करुन मतदारांची रवानगी देवदर्शनासाठी वा पर्यटनासाठी केल्या गेली आहे अशास्थितीत ज्यांचे जवळ संख्याबळ अधिक ते निवडून येणारघ ,मग हा निवडणुकीच्या समरांगणात रचलेला चक्रव्यूह भेदण्यासाठी आयोजित निवडणुकीचा बाजारच नाही का?

या निवडणुकीत अशाप्रकारे निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून जनतेच्या भल्यासाठी काही कार्य होईल ही अपेक्षा तरी ठेवता येईल काय? पैसे ,पर्यटन, देवदर्शन, आणि मनसोक्त खानपानाचा मनमुराद आनंद उपभोगणारे मतदार उद्या या निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा जाब विचारु शकणार आहेत काय?जनता आपल्या अधिकारांसाठी ह्यांच्या विरोधात काही बोलु शकणार आहे काय?

विरोधक नाममात्र दिखावा करीत आरोप करतीलही तरीही त्यांच्या आरोपांना कितपत किंमत द्यायची हेही  अनैतिक मार्गाने सत्ता काबीज करणारे हेच सत्ताधीश ठरवणार ना?तरीही दोषारोप आमच्यासारख्या चौथ्या स्थंभाच्या पाईकांच्या वाट्याला येणारच ,कां तर म्हणे आमच्या विरोधात लेखणी कां चालवली? आहे कुणाकडे उत्तर. मात्र लाळघोटेपणा करणाऱ्यांचा मानसन्मान, आवभगत आणि जाहिरातींची भेट सुद्धा. असो .

अशा ह्या बहुचर्घित बहुआयामी, बहुरंगी निवडणुकीचा फड सजणार आहे येणाऱ्या २८ व३० एप्रिल रोजी.चला तर मग ,बाजाराला जाऊ या,काय घडणार ते पाहू या.


Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*