संप, आंदोलन, तोडगा,कारणे, भाग २

संप, आंदोलन, तोडगा,कारणे, दुसरी बाजू.

भाग २

दीपक देशपांडे



महाराष्ट्र राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी दिनांक १४ मार्च रोजी आपल्या काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपावर गेले. संप सुरू झाला ,राज्यभरात तहसील कार्यालय आणि जिल्हा कार्यालयात कर्मचारी गोळा होऊन नारेबाजी ,गाणे गाणे ,थाळी वाजवणे ,निवेदने, भाषणे सुरु झाली.

मागण्यांची यादी तयार झाली ,ब्यानर लागले ,आपापली कार्यक्षेत्र सोडून ,काही ठिकाणी अगदी वाऱ्यावर सोडून हे कर्मचारी तहमीलच्या दिशेने धावत पळत सुटले आणि तेथे पोहोचल्यावर सभामंडपात बसून त्रास आला म्हणून बाहेर चहाटपऱ्या आणि तहसील परिसरात भिरभिरु लागलेत .कुणी आपल्या पोराबाळांसाठी वेगवेगळी कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी आपले सरकार केंद्रावरही गर्दी केली. कुणी शेतीभातीची कामे ,कुणी घराची कामे ,कुणी कुठली कामे तर कुणी सैर तर कुणी ट्रिप काढली, त्याची मजा घेतली तर कुणी बिअर बारची सैर केली.
शाळेत शिक्षणाचे धडे घ्यायला येणारी मूलेमुली   गुरुजी शाळेत नाहीत म्हणून कुणी गावात उंडरली तर कुणी शेतात आईवडिलांना मदत करायला शेतात गेली तर काही ठिकाणी गावातील पालकांनी लोकप्रतिनिधींनी शिक्षणाची संधी वाया जाऊ नये म्हणून या शाळेतील मुलामुलींना शिकविण्यासाठी पुढाकार घेऊन वर्ग चालवलेत तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरली व शासकीय अधिकाऱ्यांना मोक्यावर बोलावून शिक्षकांची व्यवस्था करण्यासाठी बाध्य केले.

इकडे संपकरी कर्मचारी अधिकच आक्रमकपणे शासनावर दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीत होते तर या शासकीय कार्यालयात आपले काम होत नाही म्हणून जनतेच्या रोषाचे कारण ठरु लागले परिणामी जनतेची सहानुभूती मिळण्याऐवजी जनतेचा विरोध वाढू लागला.

या मंचावरून बोलणारे वक्ते पोहोचलेल्या मातब्बर राजकारण्यांची भाषा बोलत आश्वासनांची खैरात वाटत  , बेछूट आरोप करत सुटले ,काही ठिकाणी तर प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमावर आरोप करीत बेछूट टोलेबाजी केली गेली. एकंदरीतच या कर्मचाऱ्यांचा तोल जाऊ    लागला आणि विद्यार्थी ,बेरोजगार, छोटे व्यावसायिक, शेतकरी यांचाही विरोध वाढू लागला. 

आणि समाजमाध्यमावर व प्रसारमाध्यमांवर त्या आशयाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यापैकी काही आपल्यासाठी देणे आवश्यक आहे ........

*जुनी पेन्शन - ढोंग बंद करा.

सरकारी नोकर खाजगी क्षेत्रातील लोकांना पण पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांना पण मिळावी म्हणून मागणी का करत नाहीत? आणि पेन्शन बंद होऊन १८ वर्षे झाली. आत्तापर्यंत काय करत होते. बंद केली तेव्हा काय करत होते? शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशा सरकारी कर्मचाऱ्यांनी किती आत्महत्या केल्या? आकडेवारी देऊ शकता का? सरकारी कर्मचारी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन का करत नाहीत? काम हे काम असते. त्याचे तुम्ही पेमेंट घेता. लोकांवर उपकार करत नाही. तुम्ही करता ती सेवा नाही तर नोकरी आहे. शेतकऱ्यांइतके कष्ट तुम्ही करत नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो सरकारी नोकरांसाठीच का स्थापन करण्यात आला असावा? खाजगी क्षेत्रातील व शेतकऱ्यांसाठी का नाही? एकदाचं सांगुनच टाका तुमची पोटं सामान्य कष्टकऱ्यांसारखीच आहेत की Larg XL+ आहेत. तुम्हाला पेन्शन पाहिजे, तुमच्या नंतर पत्नीला पण पाहिजे, अनुकंपा कोट्यातून पोरांना नोकरी पण पाहिजे. तुम्हाला समाधानाचा ढेकर येणार तरी कधी? तुम्ही जर एवढे प्रामाणिक आहात मग सुट्टीच्या दिवशीच्या पगाराला नकार का देत नाही. तुम्ही जर कष्टाळू आहात, लो प्रोफाइल आहात, तुमचे पाय जमिनीवर आहेत मग लोकांना ५० हेलपाटे का घालावे लागतात?  बोजा चढण्यासाठी उतरवण्यासाठी लोकांना पैसे का द्यावे लागतात? खरेदी केलेल्या मिळकतीवर नामांतर करण्यासाठी पैसे का द्यावे लागतात? तुम्ही असताना मेलेल्या माणसाच्या मिळकती कशा विकल्या जातात? तुम्ही असताना एक प्राॅपर्टी ३/४ माणसांना कशी विकली जाते. तुम्ही असताना गौण खनिज उत्खनन कसे होते? तुम्हां लोकांना कोणत्याही मार्गाने आलेला पैसा प्रिय कसा असतो. तुम्ही कर्तव्यात कसूर करत नाही मग "सरकारी काम सहा महिने थांब" हि म्हण प्रचलित कशी झाली? "हात गरम करणे" "चहापाणी" "टेबलाखालुन" " फाईलवर वजन ठेवणे" "चिरीमिरी" या शब्दांचे अर्थ जरा इस्कटून सांगाल का? तुमच्याच खात्यातील लोकांचे प्रवास भत्ते मिळण्यासाठी कमिशन घेता का नाही? कोणत्याही प्राॅपर्टीचे हस्तांतरण सरकारला भरलेल्या स्टॅम्प ड्युटीत का होत नाही? असं कोणतं काम आहे जे तुम्ही विनामोबदला करता? रेव्हेन्यू व RTO, पोलिस खाते बदनाम का आहेत? RTO ऑफिस मध्ये कोणतेही काम करताना एजंटची गरज का लागते? विना एजंट काम करायचे म्हणले की तारीख पे तारीख का मिळते? कोणत्याही ऑफिस, शालेय खरेदीत कमिशनखोरी होते की नाही? तुम्ही जर इतके चांगले गुरुजी, शिक्षक, सर, प्रोफेसर आहात मग कोचिंग क्लासेस कसे उदयाला आले? सरकार तुम्हाला ५० हजारा पासुन १/१.५ लाख पगार देत असताना शालेय व ११/१२ वी च्या विद्यार्थ्यांना १/२ लाख घालवून क्लासेस का लावावे लागतात? क्लासेस विरोधात तुम्ही आंदोलन का करत नाही? तुम्ही गुरुतुल्य असताना पेपर कसे फुटतात? काॅप्या पुरवुन परिक्षा कशा होतात? दुर्जनांना खाकीचा दरारा वाटण्याऐवजी सज्जनांना का वाटतो? "पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढू नये" असे लोक का म्हणत असावेत? सरकारी हाॅस्पिटल मधील पेशंटांना खाजगीत जाण्यासाठी रेफर कोण करते? सरकारी लॅब असताना खाजगी लॅबमध्ये रेफर का केल्या जातात? सक्षम वनखाते असताना वृक्षतोड कशी होते? एकच रस्ता २० वर्षात १० वेळा का करावा लागतो? राजकारणी, भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची प्रकरणे तुम्ही व्हिसल ब्लोअर म्हणून का उघडकीस आणत नाही?  "काम लाल फितीत अडकणे" म्हणजे काय? किंवा "लालफिताशाही" म्हणजे काय सांगाल का? शेतकरी जास्त उत्पादन घेत आहेत इतके की भाव पडत आहेत, कंपन्यांमधील कामगार त्यांचे टार्गेट अचिव्ह करत आहेत. ऑर्डर प्रमाणे प्रोडक्शन देत आहेत, मग तुम्ही नेहमी मागेच का राहाता? तुमची कृपा नेमकी अडकते कुठे? BSNL सारखी कंपनी कर्मचाऱ्यांनी कशी डुबवली? कारण काय? कोर्टात केसचे निकाल २०/३० वर्षे का लागत नाहीत? निकाल लागल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हायला परत १०/१५ वर्षे का लागतात? फालतु पोष्ट लिहून, audio, video बनवून इमोशनली ब्लॅकमेल करु नका. तुम्ही करता ते तुमचे काम आहे, उपकार नाही.

मला तुम्हाला दोनच शेवटचे प्रश्न विचारायचे आहेत.

*तुम्हाला हक्क कळतात तशी कर्तव्ये का कळत नाहीत?*

*आणि कळणार तरी कधी?*

आणि...........

संपकरी आंदोलनात वाटाघाटी आणि आरोप

*मित्रांनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार...!!!*

*१४ मार्चपासुन सुरू झालेला आपला संप सात दिवस चालुन अनपेक्षित अशा निकालाने व शासनाच्या आश्वासनाने मागे घेण्यात आला. या संपाचे नेतृत्व करणारे सर्व संघटनांचे समन्वयक मा. विश्वासराव काटकर साहेब चर्चेनंतर समाजमाध्यमांशी व प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना संप मागे घेतल्याचे जाहीर करतात. पण ते सरकारच्या या मताशी सहमत कां झालेत ? जुन्या पेंशनला तत्वत: मान्य करणे म्हणजे काय ? पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेंशन योजना राबवण्यात येईल याचा अर्थ काय ? यासाठी एक तीन सदस्यीय अभ्यासगट कशासाठी ? आम्ही कर्मचाऱ्यांनी याला काय समजावे ? हे आजतरी गुलदस्त्यात आहे. या मागची पार्श्वभुमी एकतर मा. काटकर सरांना किंवा मान. मुख्यमंत्रांनाच माहीती.*

     *परंतु मुद्दा उपस्थित हा होतो की ज्या पोटतीडीकेने आम्ही कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे सर्व नेते यांना शासनाशी चर्चा झाल्यानंतर व संप मागे घ्यायच्या अगोदर विश्वासात घेऊन सविस्तर चर्चा कां केली नाही ? स्वत:च कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी लटकवत ठेऊन एकांगी निर्णय काटकर सरांनी कां घेतला असावा ? सातच्या ऐवजी दहा दिवस लागले असते संपाला. पण सर्वांशी चर्चा होणे अपेक्षित होते. शासनाचे म्हणणे समाज माध्यमांवर किंवा प्रसिध्दी माध्यमांवर जाहीर करून आम कर्मचाऱ्यांची मतं कां मागवल्या गेली नाहीत ? हे सर्व आजतरी अनुत्तरीतच आहे.*

       *यामागे एकतर मा. काटकर सर व त्यांचे सहयोगी यांचेवर  भारी दबाव आणल्या गेले असेल किंवा ते एखाद्या प्रलोभनाला बळी पडले असावेत. या दोनच बाबींमुळे त्यांनी हा एककल्ली निर्णय जाहीर करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्कांना अधांतरी लटकवुन दिले.*

    *मला मान्य आहे की एवढ्या मोठ्या संपाचे नेतृत्व करणे सोपे नाही. नेतृत्व करणाऱ्यावर चौफेर दडपण येतेच. प्रसंगी जिवे मारण्याच्या धमक्यासुध्दा दिल्या जातात. नेतृत्वाला बदनामही केले जाते. पण म्हणुन का आपल्या सहकाऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरायचे ? मान. काटकर सर, आपण यासाठी आपला जीव जरी गमावला असता ना तर आमच्यासाठी तुम्ही पुज्यनिय ठरले असते. पण...*

*सर, तुमचा हा निर्णय चुकलाच...!*

*असो, आपल्या सांगण्यानुसार समितीच्या गठणाची तिन महीने आम्ही वाट बघु. कर्मचाऱ्यांची वाट लावली जाते की तारल्या जाते.*

*तुर्तास एवढेच. पण आपली अडचण काय होती ते एकदा राज्यातील सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना कळु दे.*

*जय हो...!!!*

*आपलाच एक हतभागी संपकरी कर्मचारी*  अशा आशयाच्या पोस्ट समाजमाध्यमावर वायरल होत आहेत.

आता या सगळ्या बाबतीत वेगळा काही विचार करण्याची आवश्यकता नाही सारेकाही कसे अगदी स्पष्टपणे समोर येत आहे. एवढेच.


दीपक देशपांडे

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*