बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त.

 बलिप्रतिपदा .



कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ।

आहे सण बलिप्रतिपदा ।।

बळीराजाचे होता पूजन ।

सुख शांती नांदे सदा ।।

दिवाळीचा चवथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही बळीच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे यावरून स्पष्ट होते.


बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे.

बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेतं. त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णू देवाला साकडे घातले. विष्णू वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला. तेव्हा “तुला काय हवे ते माग” असे बळी राजाने विचारले. यावर “फक्त त्रिपादभूमी हवी मला” वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला आणि “दिली भूमी” म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग व्यापला तर दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारताचं बळीने आपले मस्तक पुढे केले आणि विष्णूने त्याला पाताळात गाडले.

बळीराजाची दानशूरता पाहून वामन खूप आनंदी झाला, वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते.

त्यासोबतच विष्णूने त्याला एक वर दिला. ‘जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील’.

या प्रसंगामुळे लक्ष्मीला आपल्या पतीचे खूप कौतुक वाटले म्हणून तिने पती विष्णूचे औक्षण केले, त्याला ओवाळले. विष्णूने हिरे माणके, अलंकार ओवाळणी म्हणून घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो.

तसेच श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली होती. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही सुरुवात होती. त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका आणि गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा केली जाते. 


"आली आली दिवाळी।।

धन्य धन्य झाला राजा बळी।।".......

राधिका देशपांडे.



Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*