निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना ..!

 निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना...... उमेदवार आणि मतदार दोघांचीही ताकद पणाला लागणार?

                              भाग१


                      दीपक देशपांडे.

सध्या महाराष्ट्रात  मनपा,नपा. नप.चे निवडणूक वारे जोराजोराने वाहू लागले आहेत. कुणी म्हणेल हे काय? महाराष्ट्र राज्यात वर्षभर कुठल्या ना कुठल्या निवडणूका होतच असतात ,मग यात नवीन ते काय?

आम्ही तर म्हणतोय नवीन असल्याशिवाय आम्ही तो विषय चर्चेला घेतच नाही. आता या निवडणुकीत नवीन असणार आहे प्रभागांची फेररचना व सोबत असणार आहे "दाखव तुझी क्षमता" म्हणत एक प्रभाग एक उमेदवार ,एक नेतृत्व.

मागील निवडणुकीत एका सक्षम उमेदवारांसोबत दूसरा नवा चेहरा वा नवखा व्यक्ती विनासायास निवडणूक लढवित विजयी होऊन जायचा ,पण आता प्रत्येक प्रभागात एक सक्षम व दमदार नेतृत्व आणि तेवढ्याच दमदार व्यक्तीला  उमेदवार बनून मैदानात उतरावे लागणार आहे.

या निवडणुकीत राखीव जागा देखील कमी करण्यात आल्याने टेकू घेऊन निवडून येणे सहजसाध्य राहीले नाहीये. आणि महिलांची सत्तेतील भागीदारी वाढऊन ती ५०%होणार असल्याने प्रत्येक वार्डात नेतृत्व करायला पुढे येणाऱ्या महिला आणि सक्षम नेतृत्व करणाऱ्या महिला यांची चणचण भासू शकते परिणामी काही सक्षम महिलांना आतापासूनच आपल्या गोटात आणण्याची गरज लक्षात घेता मोर्चे बांधणी केली जाते आहे.

आजपासून सुरू असलेल्या ओढाताणीत प्रत्यक्ष निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख व शेवटचा क्षण येईस्तोवर उमेदवार व पक्षाची विचारधारा टिकवून ठेवली जाईलच हा केवळ एक भ्रम असणार आहे. 

वर्षोनुवर्षे एका विशिष्ट पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीला उमेदवारी न मिळाल्याने वा ऐनवेळेस दूसऱ्याच कुणाला उमेदवार बनविल्या ने नाराज कार्यकर्ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर त्याचा फटका संबंधित पक्षालाच नाही तर मैदानात उतरले असणाऱ्या सर्वच उमेदवारांना नक्कीच बसणार आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

अशा वेळी आपण कुठं टिकाव धरू शकतो, आपल्यासाठी कोणता मतदारसंघ अधिक सोयीचा ठरेल याची खातरजमा करण्यासाठी मातब्बर मंडळी कामाला लागली आहे.परिणामी जनसंपर्क व वार्ड प्रभाग फेररचनेत होऊ शकणारे बदल लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी महिला सक्षमीकरण, नेतृत्वक्षम महिला यांचा शोध सुरू केला आहे.

आता लवकरच नवीन मतदारांना सामाऊन नवीन सक्षम उमेदवार व अपेक्षित फेरबदल व नवीन प्रभागांची फेररचना याकडे प्रस्थापित नगरसेवक, मातब्बर राजकीय नेतृत्व डोळ्यात अंजन घालून लक्ष ठेवून आहेत.

आजच्या घडीला जूने कार्यकर्ते सोडून जाऊ नयेत व नवीन कार्यकर्ते कसे आपल्याकडे आकृष्ट होतात याचा पुरेपूर प्रयत्न सुरू झालेला आहे.

सगळ्यांनाच या नवरचीत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आग्रह व आपल्या हक्कासाठी आपल्या नगराच्या विकासासाठी कार्य केलेल्या उमेदवारांना प्राधान्य व दुर्लक्ष करणाऱ्यांना घराचा रस्ता दाखवित सक्षम नेतृत्व शोधून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची संधी लवकरच आपल्याला मिळणार आहे.

चला तर मग..भरभर आपणही तयारीला लागायलाच हवे.





Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*