संस्कृतीरक्षक रवीन्द्रनाथ


 भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते आणि देशाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते, विश्वकवी गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांचा आज बांगला पंचांगानुसार पोचिशे (२५) बैशाख (इंग्रजी ७ मे १८६१) हा एकशेसाठावा जन्मदिन. जन गण मन... च्या पहिल्या गायनाला (२७ डिसेंबर १९११) यंदा ११० वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्हींंच्या निमित्ताने...

*****************


संस्क्रुतिरक्षक रवीन्द्रनाथ


विनोद देशमुख , नागपूर.

९८५०५८७६२२


जगाच्या पाच ते दहा हजार वर्षांच्या इतिहासात अनेक प्रतिभाशाली व्यक्ती ठिकठिकाणी होऊन गेल्या. ते सारे आपापल्या अधिकारात दिग्गजच होते. परंतु, भारताचे विश्वकवी गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (इंग्रजांनी केलेला अपभ्रंश टागोर) यांच्या तोडीचा, बहुप्रतिभाशाली कलावंत मात्र दुसरा झाला नाही, असे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाएवढे कंगोरे पाचही खंडातील दोनशेवर देशांमधील अन्य कोणत्याही माणसाच्या ठायी आढळून येत नाही. म्हणूनच "जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय कलावंत" असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. समस्त भारतीयांनी सार्थ अभिमान बाळगावा, असाच हा विषय आहे. 

काय नव्हते रवीन्द्रनाथ ? मुळात ते कवी होते. (त्यामुळेच बंगाली समाज त्यांना "कविगुरू" म्हणतो.) ऐंशी वर्षांचे संपन्न आयुष्य जगताना या कवीने इतक्या भूमिका समर्थपणे वठविल्या की, थक्कच व्हायला होते. एक माणूस एवढे विषय समान ताकदीने हाताळू शकतो, यावर विश्वासच बसत नाही. पण, गुरुदेवांनी सर्व रूपे यशस्वी   वठवून दाखविली आणि प्रत्येक क्षेत्रात ते अव्वलच ठरले. अनेक कलांनी त्यांच्या या लीलया संचाराचा अनुभव घेत स्वत:ला संपन्न करवून घेतले, असे म्हणणे सुद्धा अतिशयोक्तीचे ठरू नये.

रवीन्द्रनाथ कवी, गीतकार, संगीतकार, नर्तक, नाट्यकर्मी, चित्रकार, शिल्पकार या अर्थाने बिनीचे कलावंत होतेच. पण मुळात त्यांचे शस्त्र लेखणी असल्यामुळे ते उच्च कोटीचे साहित्यिक सिद्ध झाले. लहान मुलांच्या कथा-कवितांपासून मोठ्यांसाठीच्या कादंबऱ्यांपर्यंत जवळजवळ सर्वच साहित्य प्रकारात त्यांची प्रभावी छाप आहे. कथा, कादंबरी, निबंध, नाटक, भाषा आदी विषय आपल्या स्पर्शाने संपन्न करीत बांगला भाषेचा डंका त्यांनी जगभर वाजविला. तत्त्वद्न्य चिंतक, शिक्षणतज्द्न्य, समाजसेवक, देशभक्त म्हणूनही त्यांनी देशाला मोलाचे योगदान दिले, यात तिळमात्र शंका नाही.


रवीन्द्र(नाथ) संगीत


तथापि, गुरुदेवांचे सर्वात मोठे योगदान आणि त्यांचे चिरंतन स्मारक रवीन्द्र संगीतालाच म्हणावे लागेल. या रूपात चौथी संगीतधारा भारतात जन्मास घालण्याचे महत्कार्य त्यांनी केले आहे. तोवर देशात ठिकठिकाणचे लोकसंगीत, उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत आणि दक्षिण भारतीय कर्नाटक संगीत हे तीन संगीतप्रवाह अस्तित्वात होते. या तीन प्रवाहांमधून आणि परदेशातील संगीतामधूनही प्रेरणा घेऊन त्यांनी स्वरचित रवीन्द्र संगीत सिद्ध केले, प्रचलित केले. इतर संगीतधारांपेक्षा रवीन्द्र संगीताचे वेगळेपण हे की, त्याचा मूळ कर्ताधर्ता एकच माणूस आहे आणि शब्द-सूर दोन्ही त्या एकाचेच आहे. इतर तीन संगीतधारांचा प्रवाह अनेकांनी मिळून वाहता ठेवला. रवीन्द्र संगीताचे तसे नाही. ते एकट्या रवीन्द्रनाथांचेच आहे. असे म्हणतात की, गुरुदेवांना काव्य आणि चाल हे दोन्ही एकदमच सुचायचे ! त्यातूनच निर्माण झाला सव्वादोन हजार गीतांचा बांगला भाषेतील रवीन्द्र संगीताचा अनमोल खजिना ! आज हा संगीतप्रकार सर्वत्र प्रचलित झाला आहे. अन्य भाषांमध्येही गेला आहे.

रवीन्द्र संगीताची सर्वात मोठी देण आहे, आपले राष्ट्रगीत... जन गण मन. हो. हे रवीन्द्र संगीतच आहे. कवी आणि संगीतकार रवीन्द्रनाथ ठाकुर.

यातही त्यांचा विश्वविक्रम असा की, बांगलादेशचे राष्ट्रगीत... आमार शोनार बांगला हे सुद्धा रवीन्द्र संगीतच आहे. दोन देशांना त्यांचे राष्ट्रगीत देणारे रवीन्द्रनाथ हे जगातले एकमेव कवी-संगीतकार आहे. याशिवाय, श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्याच प्रेरणेतून प्रसवले आहे. श्रीलंका माता... नमो नमो माता... हे श्रीलंकेचे राष्ट्रगीत आहे. त्याचे कवी आनंद समराकून हे रवीन्द्रनाथांचेच शिष्य होते आणि या दोघा गुरुशिष्यांनी मिळून हे गीत संगीतबद्ध केले आहे. याचा अर्थ, गुरुदेवांनी केली राष्ट्रगीतांची हँटट्रिक ! एकाच राष्ट्रगीतावर नाव येणे जेथे कठीण, तेथे तीन-तीन राष्ट्रगीतांचे श्रेय पदरात पडणे, ही केवढी महान कामगिरी केली आपल्या रवीन्द्रनाथांनी.


अनोखे शांतिनिकेतन


गुरुदेव हाडाचे शिक्षकच होते. त्यामुळेच त्यांनी शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरात शंभर वर्षांपूर्वी शाळा आणि विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन 1921 साली झाले. म्हणजे यंदा शंभरावे वर्ष सुरू आहे आणि आजही बालवाडी ते पीएचडी पर्यंतचे विद्यार्थी येथे शिकत आहे. आंतरराष्ट्रीय नकाशावर विश्व भारती स्वत:चे नाव टिकवून आहे आणि भारताचा झेंडा जगात फडकवत आहे, हे रवीन्द्रनाथांचे दुसरे महत्त्वाचे योगदान होय.

रवीन्द्रनाथांचे पिता महर्षि देवेन्द्रनाथ यांच्या काळापासूनच ठाकुर कुटुंबीय ब्राह्मो समाजी असल्याने मूर्तिपूजक नव्हते. त्याच्याच परिणामी शांतिनिकेतन आश्रम परिसरात फक्त निसर्गपूजा होते. देवीदेवतांच्या उत्सवांना येथे स्थान नाही. जगभरातील बंगाली समाज दुर्गापूजा जल्लोषात साजरी करतो, अपवाद फक्त शांतिनिकेतनचा ! दुर्गापूजेचा मागमूसही आश्रमात आढळत नाही. अगदी बंगभूमीत राहून सुद्धा शंभर वर्षांहून अधिक काळ दुर्गा पूजोत्सव शांतिनिकेनने टाळला आहे. केवळ रवीन्द्रनाथच असे आश्चर्य घडवू शकले. कारण, त्यांनी भारताच्या प्राचीन हिंदू संस्क्रुतीमधील निसर्गाच्या महत्तेचा स्वीकार केला आणि तोच राबविला. आपले पूर्वज मुळात निसर्गपूजकच होते. त्यामुळेच झाडे, नद्यांपासून सापांपर्यंत अनेक प्राण्यांची पूजा आपण करीत आलो आहोत. देवदेवता, मूर्तिपूजा हे पूजेत नंतर समाविष्ट झाले. गुरुदेवांनी हेच हेरले आणि शांतिनिकेतनसाठी फक्त निसर्गोत्सव तेवढे पत्करले. संस्क्रुतिरक्षणाचा त्यांचा हा विलक्षण प्रकल्प आता दुसऱ्या शतकातही राबत आहे, ही त्यांच्या द्रष्टेपणाला अन् योजकतेला मिळालेली पावतीच म्हटली पाहिजे.

या आश्रमात मूर्ती नसलेले काचेचे ब्रह्म मंदिर आहे, जेथे फक्त उपासना होते. उत्सव होतात ते निसर्गाशी-रुतूंशी संबंधित आणि उघड्यावर निसर्गरम्य वातावरणातच. बांगला नववर्ष दिन उत्सव (पोईला बैशाख), बसंतोत्सव, माघोत्सव, पौषोत्सव, वर्षोत्सवांतर्गत व्रुक्षारोपण, हलकर्षण (नांगरणीचा शुभारंभ) वगैरे. या प्रत्येक उत्सवात आणि विद्यापीठाच्या इतरही कार्यक्रमांंमध्ये दोन उपचार असतातच- उपनिषदातील मंत्र अन् रवीन्द्र संगीत. या दोघांशिवाय एकही "अनुष्ठान" येथे होऊच शकत नाही. महत्त्वाच्या कार्यक्रमांचे "पौरोहित्य" करण्याची जबाबदारी कुलगुरूंंवर (उपाचार्य) असते. उपनिषदातील संस्क्रुत मंत्र हा एकप्रकारे शांतिनिकेतनचा पासवर्डच बनलेला आहे म्हणा ना ! 


गुरुकुलाचा वारस  


शांतिनिकेतन आश्रमात प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीचा भास होतो.  जंगलातील रुषिमुनींकडे जाऊन विद्यार्थी शिकत असत. त्यात गुरुदेवांनी परिस्थितीनुरूप बदल केले. निवासी विद्यापीठ असल्याने विद्यार्थ्यांना आश्रमातील होस्टेलमध्ये राहावे लागते. कर्मचाऱ्यांचे पाल्य आणि 25 किलोमीटर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सवलत, हाच काय तो अपवाद. पाठभवन म्हणजे पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व वर्ग शक्यतो आम्रकुंजातील झाडखाली. यासाठी काही विस्तीर्ण झाडांखाली सिमेंटचे गोलाकार ओटे बांधलेले. पाऊस आला तर या वर्गांना सुट्टी ! नववीपासून मुलामुलींंना साडी-पोलके आणि बंगाली-पायजमा हा ड्रेस लागू. यातील साडी आणि बंगाली यांचा रंग भगवा. गौरप्रांगण नावाच्या विस्तीर्ण मैदानात एका टोकावर मोठा स्टेज उभारलेला. येथे आणि आम्रकुंजातही संगीत, नाटक, न्रुत्यनाट्य, नाच, साहित्यिक कार्यक्रम वगैरे दिवसा आणि रात्रीही होत असतात. निसर्गाच्या सानिध्यात, प्राचीन गुरुकुलाप्रमाणेच. 

गुरुकुलातील शिष्यांची स्वावलंबन पद्धत मात्र गुरुदेवांनी घेतली नाही. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय म्हणून मोठ्या मेस उभारल्या. यावरून त्यांचे महात्मा गांधींशी मतभेदही झाले. शेवटी, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आश्रम चालवून पाहा, असे आव्हान गांधीजींना देऊन रवीन्द्रनाथ बाहेर निघून गेले. आठवडाभरानंतर गांधींनी पराभव मान्य केला. "हे विद्यार्थी माझ्या संस्थेत कलांचे शिक्षण घ्यायला आले आहेत. ते जर साफसूफ, स्वयंपाकपाणी हेच करत राहिले तर त्यांना वेळ मिळेल का" हा गुरुदेवांचा बिनतोड युक्तिवाद गांधींनाही मान्य झाला.  


वाकडे शेपूट !


गांधींप्रमाणेच पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा गुरुदेवांचे चाहते होते. त्यामुळेच, स्वातंत्र्यानंतर विश्व भारतीला केन्द्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळू शकला आणि गेली पाऊणशे वर्षे ते निर्वेधपणे सुरू आहे. पण हीच डाव्यांची पोटदुखी राहिली ! बंगालमधील कम्युनिस्ट रवीन्द्रनाथांना "बूर्झ्वा" म्हणायचे. कारण, ब्राह्मो समाजाचे नाव घेऊन ते प्रत्यक्षात हिंदू धर्माची, वैदिक संस्क्रुतीची धारा पुढे नेत आहेत, असा त्यांचा समज (जो खराही आहे) होता. म्हणूनच, आपल्या तीन तपांच्या कारकीर्दीत डाव्या राज्यकर्त्यांनी शांतिनिकेतन आश्रमाला हरप्रकारे त्रास दिला. लोडशेडिंगचा शापच लागला होता या जागतिक ख्यातीच्या स्थानाला ! कम्युनिस्टांचा शांतिनिकेतन-द्वेष इतका टोकाचा होता की, दोन्ही मुख्यमंत्री- ज्योती बसू आणि बुद्धदेव भट्टाचार्य तीन तपात एकदाही तेथे गेले नाही. वास्तविक, पंतप्रधान हे या विद्यापीठाचे कुलपती (आचार्य) असतात आणि प्रोटोकाँलप्रमाणे मुख्यमंत्री त्यांच्या सोबत असले पाहिजे. परंतु डाव्यांनी हे कधीच पाळले नाही. उलट, पाव शतकाच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना ज्योती बसू अत्यंत उद्दामपणे म्हणाले- "मी शांतिनिकेतनला कधीच गेलो नाही याचा मला अभिमान वाटतो !" 

ही हरामखोरी नाही तर दुसरे काय ? जगात भारताची मान उंचावणाऱ्या संस्थेबद्दल अशी भावना ? कम्युनिस्ट विचारसरणी देशप्रेमाला कसा विरोध करते, त्याचा हा सबळ पुरावा. या विरोधाचे कारण एकच- रवीन्द्रनाथांनी प्राचीन सांस्क्रुतिक मूल्ये जोपासणारी व्यवस्था निर्माण केली; ती देखील धर्माचे नाव न घेता, स्तोम न माजवता, देवपूजेचा उदोउदो न करता आणि शालीनता, कलात्मकता, मानवता या उच्चतम भारतीय परंपरा कायम ठेवून. एखादा रुषीच असे काहीतरी घडवून आणू शकतो. त्याअर्थाने   रवीन्द्रनाथ ठाकुर हे एकोणीस-विसाव्या शतकातील रुषीच ठरतात.


कट्टर देशभक्त


आपल्या स्वप्नातील हे गुरुकुल उभारण्यासाठी गुरुदेवांनी त्याकाळी भरपूर पापड बेलले ! स्वत: जमीनदार असल्यामुळे आर्थिक चणचण नसली तरी, जनतेमधून निधिसंकलन करण्याचा प्रयोग त्यांनी केला. यासाठी देशात ठिकठिकाणी आणि युरोप-अमेरिकेत जाऊन सशुल्क भाषणे देत पैसे गोळा केले. त्यामुळे शांतिनिकेतन अन् विश्व भारती हे देशाचे मानबिंदू होण्यात मोठा लोकसहभागही आहे. "यत्र विश्वम् भवत्येक नीडम्" म्हणजे संपूर्ण विश्व हेच एक घर आहे, असे ब्रीदवाक्य शांतिनिकेतनसाठी निवडले गुरुदेवांनी. म्हणजे पुन्हा "वसुधैव कुटुंबकम्" ही आपली वैश्विक संकल्पनाच ! 

मुळात देशभक्त असल्यामुळेच रवीन्द्रनाथांनी एवढा खटाटोप त्याकाळी केला. परंतु तरीही अपमान, अवहेलना यांचे सत्र त्यांच्या नशिबी आले ! जन गण मन... गीतावरून मोठा वाद झाला. ब्रिटिश राजाचे कौतुक करण्यासाठी गुरुदेवांनी हे गीत लिहिले, असा आरोप त्यांच्या हितशत्रूंनी केला. या गीतातील अधिनायक, भारत भाग्य विधाता ही विशेषणे पंचम जाँर्ज साठी आहेत, असा जावईशोध काहींनी लावला. त्यांची तोंडे रवीन्द्रनाथांनी समर्थपणे बंद केली, हा भाग वेगळा ! पण मनस्ताप झालाच. ईश्वर, जगाचा नियंत्रक, भारत देश यांचा जयघोष करण्यावरही असे किटाळ स्वदेशीयांकडूनच आले, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?

रवीन्द्रनाथांनी स्वत:च्या देशभक्तीचा क्रियाशील पुरावाच सादर करून ठेवला आहे. 1913 साली नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना नाईटहूड किताब बहाल केला होता. परंतु, 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ही पदवी सरकारला परत केली. अशी हिंमत फक्त गुरुदेवांनी दाखविली. यासाठी व्हाईसराँय लाँर्ड चेम्सफोर्ड यांना कडक पत्र लिहून त्यांनी ही उपाधी ब्रिटिशांच्या तोंडावर फेकून मारली ! या पत्रात रवीन्द्रनाथ म्हणतात- "जालियनवाला घटनेच्या पार्श्वभूमीवर तुमची उपाधी मिरवणे मला लज्जास्पद वाटते ! कारण नसताना अमानवी अत्याचारांना बळी पडलेल्या माझ्या देशबांधवांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अशा कोणत्याही विशेष सन्मानाचा त्याग करणे मी जास्त योग्य मानतो." असा देशभक्त माणूस पंचम जाँर्जची तारीफ काय करू शकेल ? प्राचीन काळी रुषिमुनींना जसा राक्षसांचा त्रास झाला, तेच रवीन्द्रनाथ नावाच्या अत्युच्च प्रतिभेलाही भोगावे लागले. 

तथापि, गुरुदेवांच्या कलाविष्कारांना कोणतेच अडथळे बांध घालू शकले नाहीत. वयाच्या 16 व्या वर्षी पहिली कविता अन् काव्यसंग्रह, प्रौढ वयात मणिपुरी नाच शिकून न्रुत्यनाटिकेत अभिनय, 69 व्या वर्षी पहिल्यांदा कुंचला हाती धरून जगप्रसिद्ध चित्रांची निर्मिती, शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण न घेताही बांगला भाषेच्या विकासात मूलभूत योगदान, इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व, शिक्षणावर व्यापक चिंतन, कलांसोबतच क्रुषी आणि विद्न्यान यांंनाही प्रोत्साहन, शेवटच्या काळात चित्रपट या नव्या माध्यमात निर्मिती आणि दिग्दर्शन, सामाजिक सुधारणांचे सर्व स्तरांवर प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात अव्वल दर्जाचे सहकारी निवडण्याची उपजत हातोटी यामुळे रवीन्द्रनाथांची संपूर्ण कारकीर्द एकाचवेळी अनेक विषयांमध्ये यशस्वी राहिली. नव्हे, ती शिखरावरच पोहोचली. त्याद्वारे त्यांनी आपली संस्क्रुती प्रवाहित ठेवण्याचे आणि जगासमोर आणण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले, ज्याद्वारे समस्त भारतीयांना उपक्रुतच करून ठेवले आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कायम त्यांच्या रुणातच राहिले पाहिजे. बहुमखी प्रतिभेचा असा माणूस जगात दुसरा झाल्याची नोंद आढळत नाही. रुषी परंपरेतील या अद्वितीय महापुरुषाचे, म्हणूनच, आज त्यांच्या जन्मदिनी साभिमान पुण्यस्मरण !

****************

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*