कोरोनाला..... विनंती!

आज जागतिक पातळीवर कोरोनाचा शिरकाव झाला असून तो विश्वात हाहा:कार माजवत आहे अशा स्थितीत आलेला हा लेख..... आमच्या वाचकांसाठी...

दीपक देशपांडे.

हे परमेश्वरा.... साष्टांग दंडवत 🙏


हे विधात्या, तू इतका कठोर का झालास? कोरोनाच्या निमित्ताने तू आम्हाला धड़ा द्यायचं ठरवलसं, ते चांगले झाले. आम्हाला चांगला धडा मिळाला आहे. पण आता मात्र तू क़हर करतो आहेस. दयेचा करूणाघन असणारा तू पूर्ण दयामाया विसरलास की काय असे वाटू लागले आहे? 

हे मायबापा.... आम्ही सर्व तुमची लेकरे आहोत. तुझ्याशिवाय या सृष्टीतील एक पानही हलणार नाही, याची कल्पना आहे. मात्र, आता तू आम्हाला हतबल केले आहेस. आम्ही वादळाला घाबरत नाही, पण तू होत्याचे नव्हते करू लागला आहेस. त्यामुळे थोड वाईट वाटते.

आज अनेकांचा संसार तू मोडलेस! 

आलेला व्यक्ती जाणार आहे, हे निश्चित आहे. आम्ही कोणीच अमृताचा प्याला घेऊन आलेले नाहीत. अनंत व्याधींनी ग्रस्त असे कित्येक जण मरणासन्न अवस्थेत मृत्यूची वाट चातकासारखी पाहत आहेत. ते तसेच आहेत, मात्र ज्यांना त्यांची निहीत कर्मे पूर्ण झालेली नाहीत, त्यांना तू पटापट उचलत आहेस. आज त्या कुटुंबांकडे बघणे होत नाही. त्यांनी काय करावं, हा यक्ष प्रश्न आहे.

जन्म आणि मृत्यू हे तुझ्या हातात आहे. चांगला धडधाकट व्यक्ती जातो, तेव्हा असे वाटते की तू त्याला बोलावून घेतले. त्याची फाईल तू बाहेर काढली. तो तुझा अधिकार आहे. पण हे विधात्या, ज्यांना घेऊन जात आहेस त्यांच्या लहान मुलांनी, घरच्यांनी आता कसं जगायचं. ज्यांचे आयुष्य जगून झाले आहे, ते गेले तर ते सुखी होतील. परंतु अनेक कर्ते पुरुष तू घेऊन गेलास, त्यामुळे अनेक परिवारावर चक्क आभाळ कोसळल्यागत अवस्था आहे. 

कविवर्य भा. रा. तांबे यांनी म्हटले आहे.... 

जन पळभर म्हणतील हाय हाय

मी जाता राहील कार्य काय...

कोणा एकाच्या जाण्याने विश्वाला फरक पडत नाही, मात्र त्या कुटुंबाच्या विश्वाचे काय? ती पोकळी कशी भरून काढणार? त्या कुटुंबाची घडी कशी बसणार? अगदी २-३ वर्षांची बाळं अनाथ झाली आहेत. त्यामुळे जीव तुटतो रे.... जीव तळमळतो रे....

हे विधात्या, हे करूणाकरा....तुला विनंती आहे, हे दुष्टचक्र आता थांबव आणि सर्व पूर्ववत कर. आता धीर सुटत चालला आहे. अनेक जण खचतं चालले आहेत. तू परीक्षा पहा, तो तुझा अधिकार आहे. त्यात आम्हाला भलेही गुणवत्ता यादीत नको आणूस, पण नापासही करू नको. किमान वरपास कर, काठावर पास कर, म्हणजे जगण्याची एक नवी उमेद निर्माण होईल. उर्वरित आयुष्य हे बोनस मिळाले आहे, असे समजून आयुष्याचे सोनं करता येईल.

मी हिम्मत हारलेलो नाही, इतरांनाही हरू देणार नाही. झाले गेले विसरून जाऊ, नव्याने मार्ग काढू. पण हे विधात्या.... ज्यांना तू घेऊन गेलास, त्यांच्या कुटुंबाची वाताहात होऊ देऊ नकोस. त्यांना जगण्याची नवी उमेद दे. त्यांच्या जीवनात नवी आशा पल्लवित कर. चांगली कुटुंबे लयास जाताना पाहता येणार नाहीत. तुलाही ते पहावणार नाही.

कोरोना.... तर निमित्त होते. जे काही झाले, ती तुझीच लिला होती. काही ठिकाणी तू चमत्कारही केलेस, पण कुठे तू सर्वांना रडवलेसं. आमच्यातील भौतिक अंतर वाढविलेस, हरकत नाही. परंतु मनातील दुरी वाढवू नकोस. मनाने खूप हळवे झालो आहोत. एकमेकांची ख्याली खुषहाली जाणून घेत, एकमेकांचा आधार होण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

हे जगनायका.... हे विश्व पालनकर्ता..... तू आता हे थांबव. आम्हाला पुन्हा आधीसारखा जीवनाचा आनंद घेऊ दे. आम्हा पामरांसाठीच तू संत ज्ञानेश्वरांना पसायदान दिले होते ना...! तेव्हा तुला एकचं विनंती आहे.... पसायदानातील हा आशीर्वाद आम्हाला दे आणि कृतकृत्य कर....

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।।

जो जे वांछिल तो तें लाहो। प्राणिजात।।

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।


🙏🌺🙏


प्रसाद हेरंब फडणवीस

नागपूर

गुरुवार, २० मे २०२१ सौजन्य फेसबुक.

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*