पत्रकारांच्या वेतनश्रेणीचे शिल्पकार म. प्र. अंधारे



 पत्रकारांच्या वेतनश्रेणीचे
शिल्पकार म. प्र. अंधारे


चाळीस वर्षांपूर्वी देशभरातील वर्तमानपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार-पत्रकारेतर कर्मचारी पगार घेत असले तरी त्यांना निश्चित अशी वेतनश्रेणी लागू नव्हती. प्रत्येक संस्था स्वत:च्या हिशेबाने पगार देत असे. त्यामुळे वर्तमानपत्र कर्मचाऱ्यांच्या वेतनात समानता नव्हती. १९८० मध्ये पालेकर लवाद लागू झाला आणि पहिल्यांदा पत्रकार-पत्रकारेतरांना वेतनश्रेणी मिळाली. याचे श्रेय भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाला (IFWJ)  आहे. त्यातही नागपूरचे पत्रकारनेते मनोहरराव (म. प्र.) उपाख्य बाबासाहेब अंधारे यांना जास्त आहे. तेच अंधारे आज शुक्रवारी सायंकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी निजधामास गेले.  

त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पत्रकारांना वेतनश्रेणी, आँल इंडिया रिपोर्टरला व्रुत्तपत्र ठरविणे आणि पत्रकार सहनिवासाची उभारणी हे तीन मैलाचे दगड ठरणारे कार्य करून दाखविले. पालेकर लवादापुढे भूमिका मांडण्यासाठी महासंघाने राष्ट्रीय वेतन निर्धारण समिती स्थापन केली होती. अंधारे या समितीचे अ. भा. संयोजक होते आणि त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांचा आराखडा तयार केला. त्याआधारेच पालेकर लवादाने पत्रकार-पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेण्या निश्चित केल्या. नंतरच्या भाचावत लवादापुढेही नवीन वेतनश्रेण्यांसाठी त्यांनीच युक्तिवाद केला. त्यांचे हे मूलभूत योगदान भारतीय पत्रकार जगताला कधीच विसरता येणार नाही.

नागपूरचे प्रसिद्ध लाँ जर्नल काढणारी संस्था आँल इंडिया रिपोर्टर व्रुत्तपत्रच आहे, हे त्यांनी आंदोलने आणि न्यायालयीन लढ्यातून निर्विवाद सिद्ध करून दाखविले आणि कर्मचाऱ्यांना पूर्वानुलक्षी प्रभावाने वेतनश्रेणी मिळवून दिली. हा न्यायालयीन क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय मानला जातो.

पत्रकारांनी स्वत: उभारलेली एकमेव वसाहत संपूर्ण देशात फक्त नागपुरात आहे. सिव्हिल लाईनमधील हे "पत्रकार सहनिवास" प्रत्यक्षात येण्यालाही अंधारेच कारणीभूत ठरले. अनेक वर्षे फक्त कागदावर असलेल्या पत्रकार ग्रुहनिर्माण संस्थेला ऐंशीच्या दशकात पुनरुज्जीवित करून त्यांनीच चालना दिली आणि १९९२ मध्ये १०३ फ्लँट्सची ही वसाहत उभी राहतपर्यंत तिचा यशस्वीपणे पाठपुरावाही केला.

युगधर्म या हिंदी दैनिकात हयात घालविणारे अंधारे यांनी हे दैनिक डबघाईस आल्यानंतर, कामगारांच्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर चालविण्यास घेण्याचा अनोखा प्रयोगही काही काळ केला.

असे हे प्रयोगशील, संघर्षशील, कामगारमित्र असलेले पत्रकारनेते बाबासाहेब अंधारे नागपूर कर्मभूमीपासून दूर हैदराबाद येथे मुलाकडे असताना निरोप घेते झाले, याचे आम्हा सर्व पत्रकारांना तीव्र दु:ख आहे. त्यांच्या स्म्रुतींना अभिवादन🙏         

                    @विनोद देशमुख

                        नागपूर

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*